पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी येथील शिवतेज क्रीडा मंडळ व शिक्षण संस्थेच्या कै.भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदीरसह येथील नागरिकांचा रस्ता बंद करण्यात आला आहे. हा रस्ता बंद करण्यात अाल्याने हजारो विद्यार्थ्यांसह, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणार्यांवर कारवाई करून तातडीने हा रस्ता खुला करण्यात यावा, अन्यथा पिंपरी चिंचवड महापालिका भवनासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर यांनी दिला आहे.
या प्रकरणी मच्छिंद्र तापकीर यांनी पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्तांना निवेदनाव्दारे आत्मदहनाचा इशारा दिला आहे. मच्छिंद्र तापकीर म्हणाले की, संस्थेचे माजी सचिव मल्हारी भाऊसाहेब तापकीर व भाजपाचे कार्यकर्ते राजाराम भाऊसाहेब तापकीर व त्यांचे कुटूंबिय यांनी राजकीय वैमानस्येपोटी नाहक त्रास देण्याचा उद्योग सुरू केलाय. मल्हारी तापकीर हे अनेक वर्षे संस्थेचे सचिवपदी कार्यरत होते. मात्र संस्थेत अनेक गैरकारभार केल्याचे उघड झाल्याने त्यांची संसस्थेतून हकालपट्टी करण्यात आली. तोच राग डोक्यात धरून राजाराम तापकीर यांच्या मुलांना हाताशी धरून मला व माझ्याशी संबंधीत असणार्या संस्थेला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केलाय.
२५ वर्षापासून येथे कै.भाऊसाहेब तापकीर सुरू आहे. महापालिकेने अधिकृतपणे येथे रस्ता देखील केलाय. मात्र मल्हारी तापकीर यांनी जाणीवपूर्वक या शाळेला जाणारा रस्ता बंद करून टाकला आहे. ट्रकभरून दगड तसेच डबर या रस्त्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक तसेच येथील नागरिकांचा रस्ताच बंद झाला आहे. राजकीय व्देशातून हा सर्व प्रकार घडत असून विद्यार्थ्यांसह येथील नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. तरी महापालिकेने तसेच पोलीस प्रशासनाने हा रस्ता २४ तासात खुला न केल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर यांनी दिला आहे.
दरम्यान या मल्हारी तापकीर व राजाराम तापकीर यांच्याकडून मला व माझा मुलगा सागर तापकीर तसेच संस्थेचे कर्मचारी यांच्या जीवास धोका असून आम्हास काही झाल्यास प्रशासन जबाबदार राहिल असे मच्छिंद्र तापकीर यांनी म्हटले आहे.