पिंपरी (Pclive7.com):- नवी सांगवी येथील ओम साई ट्रस्ट व नगरसेवक नवनाथ जगताप मित्र परिवारातर्फे ३४४ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील पहिली भव्य शिवराज्याभिषेकाची गुढी नवी सांगवी येथील साई चौकात उभारण्यात आली. तसेच अन्य विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
बुधवारी दि.(६) साई चौक येथे नगरसेवक नवनाथ जगताप यांच्या हस्ते ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या सहकार्याने आयोजित केलेले हे शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी या ठिकाणी शिवयोद्धा मर्दानी आखाडा,सांगवी यांच्या वतीने लाठीकाठीचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व शिवभक्तांच्या हस्ते मशालीचे प्रज्वलन करण्यात आले. सायंकाळी सातला शिवकीर्तनकार डॉ.गजानन वाव्हळ यांचे शिवकीर्तन झाले. यावेळी शिवकीर्तनातून भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचा नयनरम्य असा जीवंत देखावा सादर करण्यात आला तसेच रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. शिवकीर्तन ऐकण्यासाठी परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
यावेळी युवा नेते शाम जगताप, अमर अदियाल, उद्योजक मनीष कुलकर्णी, गणेश बँकेचे संजय बाईत, गोपी रावत, हनुमंत जाधव, डॉ.संतोष सुपे, सुभाष जाधव, जेष्ठ नागरिक संघ, महिला वर्ग तसेच मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
दरम्यान ८ जुनला साई चौक येथे भारतीय सशस्त्र सेनेतील जवानांसाठी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून यासाठी मिलिटरी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टर व ब्लड बँकेतर्फे रक्त संकलित केले जाणार साल्याचे संयोजक नवनाथ जगताप यांनी सांगितले.