पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण समिती सभापतीपदासाठी भाजपच्या सोनाली गव्हाणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. महापालिका शिक्षण मंडळाच्या सभापतीपदी पहिल्यांदाच महिला सदस्या विराजमान झाल्या आहेत. महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती हॉलमध्ये ही निवडणूक प्रक्रीया आज पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर कामकाज पाहिले.
या निवडीनंतर महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते सोनाली गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे तसेच नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या नगरसेविका सोनाली गव्हाणे यांची शिक्षण मंडळ सभापतीपदी निवड झाल्यानंतर आमदार लांडगे समर्थकांनी महापालिकेत जल्लोष केला.
पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शिक्षण समिती सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार गुरुवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत अर्ज दाखल करायचे होते. सत्ताधारी भाजपकडून प्रा. सोनाली गव्हाणे यांचा सभापतीपदासाठी तर उपसभापतीपदासाठी शर्मिला बाबर या दोघींचे अर्ज भरण्यात आले होते. सभापती, उपसभापतीपदाची प्रत्यक्ष निवडणूक आज दुपारी १ वाजता पालिका मुख्यालयातील महापौर मधुकरराव पवळे सभागृहात होणार होती. मात्र या दोन्ही पदासाठी कोणाचाही उमेदवार अर्ज आला नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश खोडवेकर यांनी गव्हाणे आणि बाबर यांना बिनविरोध घोषित केले.
या समितीवर भाजपकडून प्रा. सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विनया तापकीर, राजू बनसोडे, उषा काळे आणि शिवसेनेकडून अश्विनी चिंचवडे यांची निवड करण्यात आली होती.






















Join Our Whatsapp Group