पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस अध्यक्ष कैलास कदम यांचे बंधू सद्गुरू कदम यांनी आज (दि.२०) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे शहराच्या राजकारणात खळबळ उडाली असून काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबई येथे भाजपाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सद्गुरू कदम यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सद्गुरू कदम यांनी भाजपाची विकासाभिमुख धोरणे, नेतृत्व आणि संघटनशक्ती यामुळे आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे सांगितले. पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या माध्यमातून कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम बंधू सद्गुरू कदम यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शहराच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः “शहराध्यक्ष स्वतःच्या भावालाच भाजपात जाण्यापासून रोखू शकत नाहीत, तर पक्षातील इतर नेते व कार्यकर्त्यांना ते कसे रोखणार?” असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. सद्गुरू कदम यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाची अंतर्गत स्थिती आणि नेतृत्वाची पकड यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षातील असंतोष, गटबाजी आणि नेतृत्वाची विश्वासार्हता यावर विरोधकांकडून टीका होत आहे.
भाजपच्या नेत्यांनी सद्गुरू कदम यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढेल आणि आगामी राजकीय वाटचालीत त्यांचा अनुभव उपयोगी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या पक्षप्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






















Join Our Whatsapp Group