पिंपरी (Pclive7.com):- नवनगर विकास प्राधिकरणामार्फत कमी खर्चात गृहप्रकल्प उभारला जातो. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत अवाच्या-सव्वा खर्च करुन प्रकल्प राबविला जातो. यामध्ये नक्कीच गौडबंगाल आहे. त्यामुळे बो-हाडेवाडी येथील पंतप्रधान आवास योजनेचा विषय फेटाळून लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या सर्व निविदा रद्द करुन या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
याबाबत स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड यांना निवेदन दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बो-हाडेवाडी येथे गृहप्रकल्प बांधण्यात येणार आहे. त्याबरोबरच च-होली, रावेत, आकुर्डीत देखील गृहप्रकल्प बांधण्यात येणार आहे. या निविदांचा दर अवाच्या-सव्वा आहे. तर, दुसरीकडे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने पेठ क्रमांक १२ येथे अशाच प्रकारचा गृहप्रकल्प होत आहे. हा प्रकल्प पालिकेच्या तुलनेत अतिशय कमी खर्चात बांधण्यात येणार असून त्यामध्ये सुविधा देखील अधिक आहेत.
त्यामुळे उद्या (बुधवारी) होणा-या स्थायी समिती सभेत बो-हाडेवाडी येथील पंतप्रधान आवास योजनेचा विषय फेटाळून लावावा. तसेच इतर तीन निविदा ही रद्द कराव्यात आणि या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी. बो-हाडेवाडी येथील प्रकल्पाला मंजुरी दिल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशाराही भापकर यांनी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group