पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयातील व्हिआयपी लिफ्ट आज सकाळी अचानकपणे बंद पडली. यात महापौर नितीन काळजे त्यांच्यासह दोन नगरसेविका देखील काही काळ लिफ्टमध्ये अडकले होते. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा सर्व प्रकार घडला असून खुद्द महापौरांनाच याचा अनुभव आला.
आज सकाळी लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती निमित्त अभिवादन करण्यासाठी महापौर नितीन काळजे मुख्यालयात आले होते. त्यानंतर तिसऱ्या मजल्यावरील महापौर दालनात ते व्हिआयपी लिफ्टने चालले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत नगरसेविका अनुराधा गोरखे आणि शर्मिला बाबर हे देखील होते. मात्र अचानक लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लिफ्ट मध्येच अडकून पडली होती. त्यावेळी सुरक्षारक्षक तसेच पदाधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक उडाली. काहीवेळानंतर लिफ्ट सुरू झाली अन् महापौरांसह नगरसेविका तिसऱ्या मजल्यावर सुखरूप बाहेर पडले.
लिफ्टमध्ये अडकण्याचा अनुभव आल्यानंतर संतप्त झालेल्या महापौरांनी लिफ्ट चालक आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच तातडीने लिफ्ट दुरूस्त करण्याचे आदेश दिले. पुन्हा असा प्रकार घडल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा सज्जड दमही त्यांनी दिला. त्यानंतर ही लिफ्ट दुरूस्तीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली होती.
पिंपरी पालिकेच्या मुख्यालयातील लिफ्ट वारंवार बंद पडण्याच्या घटना घडतात. अनेक अधिकारी तसेच नगरसेवकांना याचा अनेकवेळा अनुभव आला आहे. या लिफ्टच्या देखभाल दुरूस्तीवर आजवर मोठा खर्च करण्यात आला आहे. मात्र ही लिफ्ट वारंवर बंद पडत असते. १३ एप्रिल रोजी लिफ्ट मध्येच बंद पडली होती. त्यावेळी शरद भोंडवे नावाचा कर्मचारी लिफ्टमधून पडून गंभीर जखमी झाला होता.
महापालिकेतील मुख्यालयात एकूण ४ लिफ्ट आहेत. त्यातील एक महापौर,आयुक्त, नगरसेवक, पदाधिकारी तसेच पत्रकार यांच्या वापरासाठी व्हिआयपी लिफ्ट आहे. अन्य तीन लिफ्टचा वापर कर्मचारी तसेच नागरिक करतात. परंतू अनेकदा या लिफ्ट दुरूस्तीच्या कारणास्तव बंद असतात. तसेच या लिफ्टमधे लिफ्टमन जागेवर नसल्याच्या तक्रारीही महापालिकेत येणाऱ्या नागरिकांकडून होत आहे. आज झालेल्या घटनेमुळे या लिफ्टच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.






















Join Our Whatsapp Group