पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. या गैरव्यहारांची कागदपत्रे मागूनही दिली जात नसल्याचा आरोप करत आक्रमक झालेल्या शिवसेनेचे नगरसेवक निलेश बारणे यांनी आज (बुधवारी) स्थायी समितीच्या सभागृहाबाहेर ठिय्या मांडला होता.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज होती. त्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीची सभा होणा-या मुख्यालयातील तिस-या मजल्यावरील दिवंगत मधुकर पवळे सभागृहाबाहेर बारणे यांनी ठिय्या मांडला होता.
बारणे म्हणाले की, शिक्षण मंडळातील अनेक निविदा प्रक्रियेत गडबड झाली आहे. शिक्षण मंडळात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. या व्यवहाराची माहिती मी गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षणअधिका-यांकडे मागत आहे. परंतु, मला अद्याप माहिती दिली जात नाही. याबाबत आयुक्तांकडे देखील पाठपुरावा केला होता. मी आंदोलन करणार असल्याचे आयुक्तांना देखील कळविले होते. फाईल देत नसल्याच्या निषेधार्थ मी आंदोलन करत आहे.
अखेर शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी माहिती देण्याची तयारी दर्शविल्यानंतर बारणे यांनी हे आंदोलन मागे घेतले. दरम्यान या आंदोलनामुळे महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.