पिंपरी (Pclive7.com):- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळे निलख – विशाल नगर – कस्पटे वस्ती – वेनूनगर – रक्षक सोसायटी प्रभाग क्रमांक २६ साठी शरद पंडित गायकवाड यांनी आपली उमेदवारी जाहीर करत नागरिकांसमोर विकासाचा स्पष्ट आराखडा मांडला आहे. स्थानिक रहिवासी असलेल्या गायकवाड यांनी आपल्या जाहीरनाम्यातून प्रभागातील मूलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शरद गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छुक आहेत. त्यांच्या आजवरच्या कार्यामुळे गायकवाड हे राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

गरीबी व संघर्षातून मार्ग काढत स्वतःचा लघुउद्योग उभारलेल्या शरद गायकवाड यांना सामान्य नागरिकांच्या अडचणींची प्रत्यक्ष जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले. पाणीपुरवठ्याची समस्या, खराब अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था तसेच वस्तीतील सुरक्षिततेचे प्रश्न हे प्रभागातील प्रमुख प्रश्न असल्याचे नमूद करत, त्यावर कृतीशील आणि परिणामकारक उपाय करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

जाहीरनाम्यानुसार, पाणीपुरवठ्यासाठी २४x७ योजना प्रभावीपणे राबवणे, गटारांची भूमिगत व्यवस्था सक्षम करणे आणि उच्च दर्जाचे काँक्रीट रस्ते उभारणे ही प्राथमिक कामे असतील. याशिवाय महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे तसेच युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.

“मी केवळ आश्वासन देणारा नाही, तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणारा सेवक आहे,” असे सांगत गायकवाड यांनी नागरिकांना विश्वास व परिणाम यावर आधारित मतदान करण्याचे आवाहन केले आहे. प्रभागाच्या प्रगतीसाठी आणि नागरिकांच्या सन्मानासाठी ही लढाई असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रभाग क्रमांक २६ मध्ये नव्या ओळखीबरोबरच विकासाभिमुख नेतृत्व मिळावे, यासाठी शरद पंडित गायकवाड यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरत आहे.






















Join Our Whatsapp Group