नागरिकांकडून जागोजागी फुलांचा वर्षाव व फटाक्यांची आतषबाजी करत जंगी स्वागत, महिलांकडून औक्षण
पिंपरी (Pclive7.com):- महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची जंगी पदयात्रा आज संपन्न झाली. माजी नगरसेवक संतोष कोकणे, माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर, मोनिका नवनाथ नढे आणि उषा काळे या इच्छुकांनी एकत्रित येत ही भव्य पदयात्रा काढली. या पदयात्रेमुळे संपूर्ण काळेवाडी परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद स्पष्टपणे दिसून आली.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, राष्ट्रवादीचे नेते नाना काटे, सर्व इच्छुक उमेदवार यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला, युवा कार्यकर्ते आणि काळेवाडीतील ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

ही पदयात्रा काळेवाडीतील मुख्य पंचनाथ चौक येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. पुढे बाजीप्रभू चौक मार्गे भारतमाता चौक, जीवन चौक, क्रांतिवीर चौक, कोकण कट्टा चौक, जोशी हॉस्पिटल परिसर, उषा माई कार्यालय, आदर्श नगर, पाटील हॉस्पिटल रोड, बीआरटी रोड आदी भागांतून पदयात्रा मार्गस्थ झाली. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी जागोजागी स्वागतफलक, रांगोळ्या काढून पदयात्रेचे जल्लोषात स्वागत केले.

विशेष म्हणजे चौका-चौकात महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करत उमेदवारांचे स्वागत केले. ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात पदयात्रेचे रूपांतर जणू जनआंदोलनात झाले होते. युवकांचा मोठा सहभाग लक्षवेधी ठरला. “आपला प्रभाग, आपला विकास” आणि “राष्ट्रवादी काँग्रेस जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
एकूणच प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीत झालेल्या या पदयात्रेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणि जनाधार पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून आगामी निवडणुकीत या पदयात्रेचा निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येईल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group