
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. कैलास कुटे, श्री. प्रसाद शेट्टी, सौ. मीनलताई विशाल यादव आणि सौ. ऐश्वर्याताई अमित बाबर यांनी आज निगडी येथील हेगडेवार भवन येथे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

“वारकऱ्यांची पंढरी जशी पंढरपूर, तशी राजकारणाची पंढरी महापालिका” या भावनेतून या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचा सोहळा अतिशय अनोख्या आणि भक्तिमय वातावरणात पार पाडला. समस्त वारकऱ्यांच्या टाळ-मृदुंगाच्या गजरात, हरिपाठ म्हणत आणि जल्लोषात पदयात्रा काढत उमेदवारांनी अर्ज दाखल केला. या पदयात्रेमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

यावेळी भाजपच्या उमेदवार सौ. मीनलताई विशाल यादव आणि सौ. ऐश्वर्याताई अमित बाबर यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन व विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती घेऊन पदयात्रेत सहभाग घेतला. वारकरी परंपरेचा सन्मान राखत केलेल्या या उपक्रमाने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

उमेदवारी अर्ज दाखल करताना विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे तसेच युवकांचे स्फूर्तीस्थान उमेशभाऊ चांदगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उमेदवारांना शुभेच्छा देत प्रभागाच्या विकासासाठी भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. भक्ती, संस्कृती आणि विकासाचा संदेश देत भाजपच्या उमेदवारांनी केलेला हा अर्ज दाखल करण्याचा सोहळा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.






















Join Our Whatsapp Group