पिंपरी (Pclive7.com):- निवडणुकांचा जोर वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या खासदार सुनेत्रा पवार यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. सुरू असलेल्या बैठका आणि चर्चा या निवडणुकांच्या अनुषंगानेच होत असून, सर्वांशी संवाद साधण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

अजितदादा पवार यांच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवासाबाबत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “पिंपरी-चिंचवड शहराबाबत अजितदादांची आत्मीयता मी खूप जवळून पाहिली आहे. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी या शहरावर प्रेम केलं. शहराचा विकास कसा करता येईल याचा विचारच नाही, तर प्रत्यक्षात तो विकास करून दाखवला.”
पिंपरीत आज अजित पवारांवर होत असलेल्या टीकांबाबत त्या म्हणाल्या, “मोठं व्हायचं म्हटलं की टीका होतच असतात. त्या सहन करण्याची सवय लागते. मात्र शेवटी आम्हीही माणूस आहोत, आम्हालाही भावना आहेत, त्यामुळे अशा टीकांमुळे वेदना होतात.”

आमदार महेश लांडगे यांनी अजितदादांवर केलेल्या एकेरी आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत. नवचैतन्य देण्याच्या दृष्टीने पुढे जात असून, टिकांकडे दुर्लक्ष करणार आहोत.”
अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र दिसल्याच्या चर्चांवर बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “आम्ही कुटुंब म्हणून नेहमीच एकत्र आहोत. हे आम्ही सर्वांनी बोलून दाखवलं आहे. त्यामुळे हे चांगलंच आहे.”
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा वेग आला आहे.
























Join Our Whatsapp Group