शिंदे साहेब सांगतील तोपर्यंत प्रकल्प राबवला जाणार नाही – मंत्री उदय सामंत
पिंपरी (Pclive7.com):- निगडी सेक्टर २२ येथील १५६३ पक्क्या बैठ्या घरांचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (SRA) अंतर्गत दुबार समावेश करण्याच्या हालचालींना स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात झालेल्या सभेमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हा प्रकल्प माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रालयाच्या अखत्यारित आहे. शिंदे साहेब जोपर्यंत स्पष्ट निर्णय देत नाहीत, तोपर्यंत या प्रकल्पाबाबत कोणताही चुकीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचू दिला जाणार नाही आणि प्रकल्प राबवला जाणार नाही.”

निगडी सेक्टर २२ येथील संजयनगर, मिलिंदनगर, विलासनगर, राजनगर, बौद्धनगर आणि इंदिरानगर या भागांमधील एकूण १५६३ ओटेधारकांचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वतीने दिनांक २१ जानेवारी १९८९ ते २४ एप्रिल १९८९ या कालावधीत टप्प्याटप्प्याने अधिकृत व कायदेशीर पुनर्वसन करण्यात आलेले आहे.
असे असतानाही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), पुणे कार्यालयातील काही अधिकाऱ्यांकडून नागरिकांना खोटी व दिशाभूल करणारी माहिती देत दुबार पुनर्वसन प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्ज भरायला लावले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रारूप यादीत नावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया जोरकसपणे सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

या संदर्भात १५६३ घरधारक नागरिकांनी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून सदर दुबार पुनर्वसन प्रक्रिया तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, आधीच कायदेशीर पुनर्वसन झाले असताना पुन्हा SRA अंतर्गत समावेश करणे अन्यायकारक आणि बेकायदेशीर आहे.
पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, सर्व नागरिकांनी लेखी हरकती नोंदवूनही प्रशासनाकडून पुढील कार्यवाही थांबवली जात नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. त्यामुळे निगडी सेक्टर २२ येथील सुरू असलेला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प HB तातडीने रद्द करून १५६३ पक्क्या बैठ्या घरांना कायदेशीर दिलासा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील या प्रकरणी SRA प्रकल्पाला नागरिकांचा विरोध असल्यास हा प्रकल्प होऊ देणार असे सांगितले. या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
























Join Our Whatsapp Group