
पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील ट्रायोज ते झूलेलाल टॉवर सोसायटी परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मुख्य रस्ता आणि वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक नागरिकांसोबत थेट संवाद साधत नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका कुंदाताई भिसे आणि नगरसेविका अनिताताई काटे यांनी रस्त्याच्या कामाला गती देण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली.

या बैठकीदरम्यान रस्त्याची सद्यस्थिती, कामातील तांत्रिक व प्रशासकीय अडथळे तसेच रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. परिसरातील वाढती लोकसंख्या, वाहतुकीची वाढती कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली.
नागरिकांच्या समस्या ऐकून घेत नगरसेवकांनी येत्या सहा महिन्यांत रस्ता रुंदीकरणाच्या प्रक्रियेला गती देऊन प्रत्यक्ष कामात लक्षणीय प्रगती दिसून येईल, असे आश्वासन दिले. नागरिकांची सुरक्षितता आणि सुरळीत दळणवळण ही आमची प्राथमिक जबाबदारी असून, रस्त्याच्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

नगरसेवकांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे ट्रायोज आणि झूलेलाल टॉवर परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बैठकीस स्थानिक नागरिक, सोसायटीचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group