पिंपरी (Pclive7.com):- भेसळखोरांचा कर्दनकाळ.. खऱ्या अर्थाने जननायक असलेले.. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे शनिवारी (दि. २२ ऑगस्ट, रोजी सायंकाळी ५.३० वाजता) पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने त्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रामाणिक, निर्भीड आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची राज्यभर स्वतंत्र ओळख आहे. प्रशासनातील पारदर्शकता, लोकहिताला प्राधान्य आणि कठोर निर्णयक्षमतेमुळे त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. ‘लोकहिताची कामे प्रामाणिकपणे करणारा सनदी अधिकारी’ अशी त्यांची प्रतिमा जनमानसात निर्माण झाली आहे.

सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळविरोधी मोहिमेला गती दिली आहे. राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे ते पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार मयूरेश कोण्णूर हे तुकाराम मुंढे यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहेत. ‘भेसळमुक्त महाराष्ट्र, आरोग्यदायी महाराष्ट्र’ या विषयावर प्रशासन, सुशासन, पारदर्शकता आदी विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरिकांना आवाहन..
या नाट्यगृहात मर्यादित आसनक्षमता आहे. तिथे जेमतेम १२०० प्रेक्षकांना सामावून घेता येऊ शकते. त्यामुळे प्रथम येईल त्यास प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या नियोजित वेळेपूर्वी नागरिकांनी स्थानापन्न व्हावे, अशी विनंती आहे. तसेच पहिल्या तीन रांगा राखीव राहतील. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस व आयोजकांना सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group