
पिंपरी (Pclive7.com):- मोशी कचरा डेपो परिसरात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. या घटनेचे राजकीय भांडवल करण्याऐवजी मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे, दुर्घटनेची वस्तुनिष्ठ चौकशी करणे आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा मुख्य प्रवक्ते तथा माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांनी व्यक्त केली.

दुर्गे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोशी दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून मृतांच्या कुटुंबीयांचे दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. महापालिकेकडून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, त्यासोबतच दुर्घटनेमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी वस्तुनिष्ठ चौकशी होणे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर चौकशीची मागणी करणे हा लोकशाहीतील प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, पुराव्यांशिवाय भाजपचे स्थानिक नेतृत्व आणि आमदार महेश लांडगे यांचे वारंवार नाव घेऊन आरोप करणे आम्ही सहन करणार नाही, असा इशारा दुर्गे यांनी दिला. आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधताना दुर्गे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये वारंवार येऊन स्थानिक लोकप्रतिनिधींवर आरोप करण्याऐवजी ठोस पुरावे आणि अधिकृत कागदपत्रांसह भूमिका मांडावी. केवळ राजकीय वक्तव्यांच्या माध्यमातून एखाद्या लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला तथ्यांच्या आधारे योग्य प्रत्युत्तर दिले जाईल.

‘शहर हे कोणाच्याही राजकीय प्रयोगाचे मैदान नाही’
पिंपरी-चिंचवड हे कोणत्याही एका व्यक्तीच्या राजकीय प्रयोगाचे मैदान नसून शहरातील प्रश्नांवर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार जनतेचा आहे. शहरातील जनतेने भारतीय जनता पक्षाला सलग दुसयांदा सत्ता दिली असून, नागरिकांनी दिलेल्या जनादेशाचा आदर सर्वांनी करावा, असेही दुर्गे यांनी नमूद केले. आज पिंपरी-चिंचवडसमोर कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न उभा आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित या प्रश्नावर राजकीय श्रेयवाद करण्यापेक्षा विधायक चर्चा करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्याबरोबरच कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी ठोस निर्णय घेतले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

मोशी दुर्घटनेतील मृतांना खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे, दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी करणे, दोषींवर कारवाई करणे आणि भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे होय. “राजकारण करायचे असेल तर विकासाच्या मुद्यांवर करा; मात्र मृतांच्या दुःखावर राजकारण करू नका. शहराच्या स्थापनेपासून कचरा समस्येवर कोण-कोणत्या उपाययोजना केल्या याचे आत्मचिंतन करावे.– राजाभाऊ दुर्गे, भाजपा मुख्य प्रवक्ते.




















Join Our Whatsapp Group