
पिंपरी (Pclive7.com):- ताथवडे गावठाण परिसरातील प्रलंबित सिटी सर्व्हेचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. पुण्यात झालेल्या भेटीत त्यांनी निवेदन सादर करत ताथवडे गावठाणातील नागरिकांना सिटी सर्व्हेअभावी भेडसावणाऱ्या विविध अडचणींकडे लक्ष वेधले. याची गंभीर दखल घेत महसूलमंत्री बावनकुळे यांनी सिटी सर्व्हेची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

ताथवडे गावठाण परिसराचा सिटी सर्व्हे अद्याप पूर्ण झालेला नसल्याने मालमत्तेची मोजणी, बांधकाम परवानगी तसेच इतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मौजे ताथवडे, ता. मुळशी, जि. पुणे येथील गावठाणाचा सिटी सर्व्हे व्हावा यासाठी राहुल कलाटे यांनी सन २०२० पासून सातत्याने पाठपुरावा केला असून संबंधित विभागाकडे वेळोवेळी पत्रव्यवहारही केला आहे. मात्र, अद्याप या प्रश्नावर ठोस कार्यवाही झालेली नाही.

सध्या ताथवडे परिसराचा समावेश पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत झाला असला तरी सिटी सर्व्हे नसल्यामुळे मालमत्ताधारकांना त्यांच्या जागांबाबत आवश्यक कायदेशीर बाबी पूर्ण करता येत नाहीत. परिणामी परिसराच्या नियोजित विकासाला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना विविध प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

यासंदर्भात महसूलमंत्री बावनकुळे यांनी निवेदनावर सकारात्मक भूमिका घेत जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांच्याकडे ते पाठवून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ताथवडे गावठाणातील नागरिकांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे. या भेटीदरम्यान नगरसेवक राहुल कलाटे यांच्यासह ताथवडे येथील उद्योजक गणेश फेंगसे, काळूराम नवले आणि रविंद्र गोफणे उपस्थित होते.

राहुल कलाटे म्हणाले, “ताथवडे गावठाण परिसराचा सिटी सर्व्हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. एका बाजूला अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाते, तर दुसऱ्या बाजूला सिटी सर्व्हे नसल्याने नागरिकांना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. त्यामुळे परिसराच्या विकासावर परिणाम होत आहे. या प्रश्नासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले असून त्यांनी तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.”






















Join Our Whatsapp Group