
पिंपरी (Pclive7.com):- भारताच्या फाळणी दरम्यान लाखो नागरिकांनी सोसलेल्या वेदना, विस्थापन आणि बलिदानाचे स्मरण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ निमित्त भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चातून फाळणीतील पीडित आणि निर्वासित सिंधी बांधवांप्रती आदर व एकात्मतेची भावना व्यक्त करण्यात आली.

डिलक्स चौक, पिंपरी येथून सुरू झालेला हा मूक मोर्चा शगुन चौक आणि साई चौक मार्गे पिंपरी कॅम्पमधील अडवाणी धर्मशाळा येथे पोहोचला. संपूर्ण मोर्चा शांतता, शिस्त आणि गंभीर वातावरणात पार पडला. फाळणीच्या जखमा आणि त्या काळातील मानवी वेदनांचे स्मरण करत उपस्थितांनी पीडितांना आदरांजली वाहिली.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, “१४ ऑगस्ट १९४७ हा दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी दिवस आहे. फाळणीच्या काळात लाखो लोकांनी आपली घरे, कुटुंबे आणि आयुष्य गमावले. निर्वासित बांधवांचा त्याग आणि संघर्ष कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या स्मृती जपणे आणि हा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे.”

भारतीय स्वातंत्र्य पर्वाचे अभ्यासक हेमदेवजी थापर यांनी फाळणीमागील राजकीय परिस्थिती, त्याचे दूरगामी परिणाम आणि त्या काळात समाजाने केलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. इतिहासातील अशा दुःखद घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सत्य जाणून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या मूक मोर्चात आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, संगठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस मधुकर बच्चे, वैशाली खाडये, विकास डोळस, सदाशिव खाडे, वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटणी, ॲड. नानिक पंजाबी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते, सिंधी समाजातील ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

फाळणीतील पीडितांच्या स्मृतींना अभिवादन करत इतिहासातील वेदनादायी घटनांचे स्मरण आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा मूक मोर्चा पिंपरीत भावपूर्ण वातावरणात पार पडला.






















Join Our Whatsapp Group