
पिंपरी (Pclive7.com):- मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार हे आज दुसऱ्यांदा पिंपरी-चिंचवड महापालिकेत आले असून त्यांनी या दुर्दैवी घटनेचे विनाकारण राजकारण सुरू केले आहे, असा आरोप सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी केला आहे.

शितोळे म्हणाले की, आमदार रोहित पवार यांनी आमदार महेश लांडगे यांचा नामोल्लेख करून त्यांना मोशी दुर्घटना प्रकरणात लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. आमदार महेश लांडगे यांची हिंदुत्ववादी ओळख दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असल्याने त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न रोहित पवारांकडून केला जात आहे. केवळ महेश लांडगे यांचे नाव घेऊन राजकीय लाभ मिळविण्याचा प्रयत्न पवार घराण्याला शोभणारा नाही.

मोशी दुर्घटनेबाबत कायदेशीर चौकशी सुरू असून दोषींवर कारवाईची प्रक्रिया देखील सुरू आहे. या प्रकरणात महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही तथ्ये समोर येण्यापूर्वी बिनबुडाचे आरोप करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रोहित पवार यांना काही मंडळींकडून चुकीची माहिती दिली जात असून त्यावर आधारित वक्तव्ये केली जात आहेत, असा दावा करत शितोळे यांनी केला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील अस्वस्थता पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन त्यांनी व्यक्त करू नये, असा टोलाही लगावला.

दुर्दैवी दुर्घटनेनंतर संबंधित कुटुंबीयांचे सांत्वन करणे आणि त्यांना धीर देणे अधिक गरजेचे होते. मात्र, महिनाभरानंतर शहरात येऊन या घटनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही प्रशांत शितोळे यांनी केला.






















Join Our Whatsapp Group