
पिंपरी (Pclive7.com):- गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख चेतन पवार यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत शहरातील खड्डे तातडीने बुजविण्याची आणि रखडलेली रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची मागणी केली आहे. शहरातील खड्डे तातडीने न बुजवल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हे खड्डे अधिक धोकादायक ठरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेने शहरातील सर्व रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी तसेच नागरिकांना सुरक्षित रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याशिवाय रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना गती देऊन ती निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असेही निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, प्रशासनाने पुढील १० दिवसांत ठोस कार्यवाही केली नाही, तर नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संपूर्ण शहरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शहरप्रमुख चेतन पवार यांनी दिला आहे.























Join Our Whatsapp Group