
पिंपरी (Pclive7.com):- स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय श्रमिक आघाडी, भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (१५ ऑगस्ट) संत तुकाराम नगर येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी केले आहे.

पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भोसले यांनी सांगितले की, संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून दुपारी ३ वाजता रॅलीला प्रारंभ होणार आहे. गंगानगर, महेशनगर, ॲटलॉस कॉलनी, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, वायसीएम हॉस्पिटल आणि आचार्य अत्रे रंगमंदिर परिसरातून मार्गक्रमण करत रॅली पुन्हा कार्यालयाजवळ येणार असून, त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या रॅलीसाठी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, विधान परिषद सदस्या उमा खापरे, आमदार अमित गोरखे, महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सत्तारूढ गटनेते प्रशांत शितोळे यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून ते उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी भोसले म्हणाले की, तिरंगा हा देशाच्या स्वाभिमानाचे आणि एकतेचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांच्या स्मृती जागवण्यासाठी तसेच देशप्रेम व्यक्त करण्यासाठी अशा रॅलींचे महत्त्व आहे. गेल्या ३० वर्षांपासून राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत असून, यंदा त्याला तिरंगा रॅलीची जोड देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड ही कामगारांची नगरी असून, शहरातील कामगार, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशप्रेमी नागरिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. सुमारे एक हजारांहून अधिक नागरिक रॅलीत सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करत सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिस प्रशासनालाही माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सायंकाळी ६ वाजेपर्यंत रॅली पूर्ण होणार असून त्यानंतर आयोजित सभेत उपस्थित लोकप्रतिनिधी व मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाला अभिवादन करण्यासाठी आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या तिरंगा रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन यशवंतभाऊ भोसले यांनी केले.






















Join Our Whatsapp Group