मोशी (Pclive7.com):- समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेचा सहावा वर्धापन दिन साधुराम गार्डन मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेच्या माध्यमातून सक्षम झालेल्या पाच महिला उद्योजिकांचा तसेच सर्वाधिक सदस्य जोडणाऱ्या समन्वयिकेचा विशेष सन्मान करण्यात आला.

ऋतुजा सांडभोर, मीनाक्षी फरतडे, स्नेहा गिरडकर, अर्चना देशमुख आणि सरिता घोगरे यांना ‘सक्षम उद्योजिका’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तर भाग्यश्री जोशी-काटकर यांना ‘जास्त सदस्य जोडणाऱ्या समन्वयिका’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य सादरीकरण तसेच विविध गेम शोचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या माध्यमातून सक्षम झालेल्या महिला उद्योजिकांचे विविध वस्तूंचे स्टॉलही यावेळी लावण्यात आले.

संस्थेच्या संस्थापिका राजश्रीताई गागरे यांनी महिलांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळून व्यवसाय कसा करावा, व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून कसे पाहावे आणि व्यवसायात सातत्य कसे टिकवावे, याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉ. श्रद्धा जवंजाळ व पत्रकार मनीषा थोरात तसेच विशेष उपस्थिती म्हणून नगरसेविका अश्विनीताई वाबळे, माजी नगरसेविका सीमाताई सावळे, सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धाताई लांडगे, डॉ. दिपाली कुलकर्णी, डॉ. क्षमा धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत महिला एकमेकींना साथ देत उद्योग क्षेत्रात पुढे जात असल्याचे नमूद केले. संस्थेने ३२६४ सदस्यांचा टप्पा पार केला असून भविष्यात हा आकडा ५ ते १० हजारांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी लोकरे यांनी केले, तर प्रस्तावना प्रांजल भादले यांनी केली. वर्धापन दिनानिमित्त उपस्थित प्रत्येक महिलेला भेटवस्तू देण्यात आली. यासाठी पूना गाडगीळ अँड सन्स, भोसरी शाखा यांचे विशेष सहकार्य लाभले.





















Join Our Whatsapp Group