पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज प्रभागनिहाय संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र सर्व्हर अथवा स्टोरेज प्रणालीद्वारे सुरक्षितरीत्या संग्रहित करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.

सध्या शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज निगडी येथील पवळे ब्रीजजवळ असलेल्या पीसीएमसी स्मार्ट सिटी डेटा सेंटरमध्ये संग्रहित केले जाते. मात्र महानगरपालिकेच्या दहा क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रानुसार संबंधित प्रभागांचे फूटेज त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयात उपलब्ध करून दिल्यास आपत्कालीन परिस्थितीत ते तातडीने मिळू शकणार असल्याचे कलाटे यांनी नमूद केले.

चोरी, अपघात, वाहतूक कोंडी किंवा अन्य अनुचित घटना घडल्यानंतर संबंधित सीसीटीव्ही फूटेज त्वरीत उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असते. प्रभागनिहाय फूटेज स्थानिक स्तरावर उपलब्ध असल्यास पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती त्वरित मिळून घटनांवर प्रभावी कारवाई करता येईल, असे त्यांनी सांगितले.

यासोबतच प्रभाग क्रमांक २६ (वाकड–पिंपळे निलख) परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी करून ते कार्यरत आहेत की नाही, याची तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. बंद पडलेले अथवा तांत्रिक बिघाड असलेले कॅमेरे तातडीने दुरुस्त करावेत तसेच नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थापन आणि संवेदनशील ठिकाणांचा विचार करून आवश्यक त्या भागांमध्ये नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्यासोबतच फूटेज त्वरित उपलब्ध होणे आवश्यक असल्याने सर्व दहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रभागनिहाय सीसीटीव्ही फूटेज सुरक्षितरीत्या संग्रहित करण्याची समान व्यवस्था तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी नगरसेविका स्नेहा कलाटे यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group