पिंपरी (Pclive7.com):- नारायणगाव येथील एका कला केंद्रात फायरिंग करुन खुनाच्या प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपी अविनाश लक्ष्मण कोळेकर (वय ३० वर्षे, रा हनुमान वाडी, चाकण रोड, आळंदी देवाची) याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव परिसरातील कांदळी गाव येथील कलाकेंद्र येथे किरकोळ कारणांवरुन दोन गटामध्ये झालेल्या वादातुन एका गटाने फायरिंग करून खुनाचा प्रयत्न करुन आरोपी हे पसार झाले होते. याप्रकरणी चार अनोळखी आरोपीविरुध्द नारायणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी हे पिंपरी चिंचवडच्या हद्दीतील रहिवासी असल्याची गोपनिय माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस अंमलदार गणेश सावंत व विनोद वीर यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने (दि.११) रोजी रोहकल फाटा, चाकण येथे सापळा रचून आरोपी अविनाश लक्ष्मण कोळेकर याला ताब्यात घेतले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक रावसाहेब मोटे, पोलिस उपनिरीक्षक महेश खाडे, पोलीस अंमलदार हर्षद कदम, गणेश कोकणे, गणेश सावंत, विनोद वीर, गणेश हिंगे अशा पथकाने केली आहे.





















Join Our Whatsapp Group