वाकड (Pclive7.com):- राष्ट्र सेविका समितीच्या ९० वर्षांच्या गौरवशाली सेवावाटचालीचे औचित्य साधून राष्ट्र सेविका समिती, अहिल्या शाखा वाकड, पुणे यांच्या वतीने उत्कर्ष चौक ते छत्रपती चौक, वाकड या मार्गावर १०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

या वृक्षारोपण मोहिमेत समितीच्या महिला सेविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा’ हा संदेश देत पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्र सेविका समितीच्या सेविका तसेच प्रभाग क्रमांक २६ च्या नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे उपस्थित होत्या. राष्ट्र सेविका समितीच्या संस्कारातून मिळालेली राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा लोकप्रतिनिधी म्हणूनही पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्र सेविका समितीने गेल्या ९० वर्षांत राष्ट्रभक्ती, समाजसेवा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा सातत्याने प्रसार केला आहे. त्याच सेवाभावी परंपरेचा भाग म्हणून हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. लावण्यात आलेली रोपे भविष्यात मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतरित होऊन परिसरातील नागरिकांना शुद्ध हवा, सावली आणि हिरवाई प्रदान करतील. तसेच पुढील पिढ्यांसाठी निरोगी आणि संतुलित पर्यावरण निर्माण करण्यास हातभार लावतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

राष्ट्र सेविका समितीच्या ९० वर्षांच्या सेवावाटचालीतून राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिक व्यापक व्हावा, तसेच सेवाभावाची भावना जनसेवेत अधिक प्रभावीपणे पुढे न्यावी, हीच या उपक्रमामागील प्रेरणा असल्याचे स्नेहा रणजित कलाटे यांनी नमूद केले.





















Join Our Whatsapp Group