पिंपरी (Pclive7.com):- विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवून शैक्षणिक परिसर पूर्णपणे ‘ड्रग-फ्री कॅम्पस’ करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ताथवडे येथील श्री बालाजी युनिव्हर्सिटीमध्ये भव्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शहरातील सुमारे ६०० शाळा व महाविद्यालयांमधील जवळपास १,१०० प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षक प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमात पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविरोधात व्यापक जनजागृती निर्माण करण्याचे आवाहन केले. पोलीस, शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या संयुक्त सहभागातून प्रत्येक शाळा व महाविद्यालय ‘ड्रग-फ्री कॅम्पस’ बनविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये Narcotics Prevention Committee स्थापन करणे, विद्यार्थी स्वयंसेवक नियुक्त करणे, ‘ड्रग-फ्री कॅम्पस अॅक्शन प्लॅन’ तयार करणे, जनजागृती स्पर्धा, व्याख्याने, कार्यशाळा, पथनाट्य, रॅली तसेच पालकांसाठी विशेष जागृती सत्रांचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या वर्तनातील संशयास्पद बदल वेळेत ओळखून त्यांच्याशी संवेदनशील संवाद साधण्यावरही भर देण्यात आला.

अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांनी प्रास्ताविक करताना अंमली पदार्थांचे सेवन ही केवळ एका व्यक्तीची समस्या नसून त्याचा परिणाम कुटुंब, शिक्षण, आरोग्य आणि संपूर्ण समाजावर होत असल्याचे सांगितले. व्यसनमुक्त विद्यार्थी आणि व्यसनमुक्त महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प या अभियानामागे असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुक्तांगण संस्थेच्या मुक्ता पुणतांबेकर यांनी व्यसनमुक्तीसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. तर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे संतोष पाटील यांनी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सादरीकरण केले. कार्यक्रमात सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम यांनी उपस्थितांना अंमली पदार्थविरोधी शपथ दिली. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी आभार प्रदर्शन केले.

दरम्यान, अंमली पदार्थांच्या विक्री, सेवन किंवा संशयास्पद हालचालींबाबत माहिती असल्यास हेल्पलाईन क्रमांक ७७९८१००११२ तसेच मानस हेल्पलाईन १९३३ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.





















Join Our Whatsapp Group