
पिंपरी (Pclive7.com):- स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदारांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेला गौरव देत राष्ट्रपती पदक, अतिउत्कृष्ट सेवा पदक, उत्कृष्ट सेवा पदक तसेच विशेष सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये एकूण ४४ पोलिस अधिकारी व अंमलदारांचा समावेश असून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्तालयातील पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त संजय आवटे आणि पोलिस उपायुक्त श्रेया वेडकर यांच्यासह २९ अधिकारी व अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे. तसेच १५ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.

गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय सेवेसाठी पोलिस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या दीर्घकालीन आणि निष्ठावंत सेवेला हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
उत्कृष्ट सेवा पदकासाठी पोलिस उपायुक्त श्रेया वेडकर, पोलिस निरीक्षक विनोद पाटील, सुहास आवाड, शिवशरण गावडे, संजय शिंदे, संतोष बिर्जे, आशीष ढाके यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, उपराष्ट्रपतींकडून मिळालेल्या पोलिस शौर्य पदकांचे वितरणही नुकतेच करण्यात आले. पोलिस आयुक्तालयातील शिवनेरी हॉल येथे आयोजित समारंभात पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते पदक प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळालेल्या या सन्मानामुळे संपूर्ण दलाचा गौरव वाढला असून त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे.




















Join Our Whatsapp Group