
पिंपरी (Pclive7.com):- स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ मर्यादित (शाखा : चिखली-मोशी) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी आणि नागरिक सुरक्षेचा संदेश देणारा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. महासंघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी चिखली, एमआयडीसी भोसरी आणि दिघी पोलीस ठाणे तसेच संबंधित उपायुक्त (DCP) कार्यालयाला भेट देऊन स्वातंत्र्यदिन साजरा केला आणि पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार केला.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी चोवीस तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांच्या निःस्वार्थ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘रिअल हिरोज’ या संकल्पनेअंतर्गत हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुहास पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली-मोशी शाखेच्या कार्यकारिणी सदस्यांची उपस्थिती होती. यामध्ये आशिष सातकर, विजय महाजन, ॲड. नितीन शिला, लक्ष्मण इंदोरे, विनायक जगताप, आशा वाबळे, सुभाष गारगोटे, राजेंद्र माने, डॉ. विनोद भेलोसे, स्वप्निल झांबरे, राहुल मोकाशी, राजेंद्र शिंदे आणि डॉ. माणिक गावडे यांचा समावेश होता.

महासंघाच्या या उपक्रमाचे पोलीस प्रशासनाने स्वागत करत नागरिक आणि पोलीस यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास अशा कार्यक्रमांची मदत होत असल्याचे सांगितले. नागरिकांच्या सहकार्याने परिसरात अधिक सुरक्षित आणि सुसंवादी वातावरण निर्माण करण्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पोलीस दलाच्या कार्याला सलाम करणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून विशेष कौतुक होत असून समाजातील ‘रिअल हिरोज’ना दिलेला हा मान सन्मान प्रेरणादायी ठरत आहे.






















Join Our Whatsapp Group