
– बाळासाहेब जवळकर –
पिंपरी (Pclive7.com):- मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचंही महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या मराठी नाटकांची महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे. आतापर्यंतच्या नाट्य प्रवासात अनेक नाटकांनी इतिहास घडवला आहे. असंच इतिहास घडवणारं एक बहुचर्चित नाटक म्हणजे ‘पुन्हा सही रे सही’…

१५ ऑगस्ट २००२… भारतीय स्वातंत्र्यदिवस.. मराठी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या ‘सही रे सही’ या नाटकाचा पहिला प्रयोग याच दिवशी मुंबईत छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात झाला. तेव्हापासून आजपर्यंत अर्थात १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत, म्हणजे गेल्या २४ वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत हे नाटक रंगभूमीवरचा चमत्कार ठरले आहे. केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित आणि मराठीचा सुपरस्टार भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेले ‘सही रे सही’ हे नाटक पाहिले नाही, असा नाट्यप्रेमी प्रेक्षक सापडणे अवघड आहे. पुन्हा-पुन्हा नाटक पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि नव्याने नाटक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येतच आहेत.

सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा या नाटकाला उदंड प्रतिसाद मिळतो आहे. अगदी पहिल्याच वर्षात ३६५ दिवसांत तब्बल ५६७ हाऊसफुल्ल प्रयोग झाले. प्रारंभीच्या काळात एकाच दिवसांत तीन-तीन प्रयोगही झालेत. ‘सही रे सही’ने नाट्यसृष्टीत अक्षरश: धुमाकूळ घातलेला आहे. इतक्या वर्षांनंतरही ‘सही’चे गारुड कमी झालेले नाही. प्रेक्षकांच्या गर्दीचा ओघही कायम आहे. सातत्याने ‘हाऊसफुल्ल’ची पाटी लागणारे असे एखादेच नाटक असते, ते भाग्य ‘सही रे सही’ला लाभले आहे. प्रेक्षकांनी या नाटकावर, यातील कलावंतांवर मनापासून आणि भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळेच आता ते कोणाच्या मालकीचे राहिले नसून पूर्णपणे रसिक प्रेक्षकांचे झाले आहे.

भरत जाधव यांनी या नाटकात ‘मदन सुखात्मे’, ‘गलगले’, ‘हरी’ आणि ‘रंगा’ या विविध चार व्यक्तीरेखा समर्थपणे साकारल्या आहेत. विनोद, अभिनय, टायमिंग, देहबोली आणि प्रसंगानुरूप बदलणाऱ्या व्यक्तिरेखांमुळे प्रत्येक प्रयोगात प्रेक्षकांना नवे काहीतरी अनुभवायला मिळते. संपूर्ण नाटकात दिसणारी भरत जाधव यांची एनर्जी कौतुकास्पद आहे. एकच कलाकार एकच नाटक सलगपणे २४ वर्षे करतो आहे आणि तरीही प्रेक्षकांचे पाठबळ तसुभरही कमी झालेले नाही, हे भाग्य भरत जाधव यांना लाभले आहे. जयराज नायर, मनोज टाकणे, प्रशांत विचारे अशा सर्वांच्या भूमिका महत्त्वपूर्ण आहेत. ‘अनिकेत राजे’, ‘दत्तू’, ‘मीरा’, ‘मनोरमा’, ‘लेले’, ‘अण्णा’ अशी सगळीच पात्रे धमाल आणतात, लक्षात राहतात. क्षणाक्षणाला हास्याचे कारंजे फुलवणारे, रहस्यमय धाटणीचे आणि ‘सुपरफास्ट’ वेगाचे हे नाटक पहिल्या प्रवेशापासून ते शेवटच्या प्रसंगापर्यंत खिळवून ठेवते. एक परिपूर्ण आणि सर्वांगसुंदर नाटक पाहिल्याचा आनंद ‘सही रे सही’मुळे प्रेक्षकांना मिळतो.

अनेकांचे अथक परिश्रम, भक्कम साथ, दृश्य तसेच अदृश्य स्वरूपातील मदतीचे हात, प्रेक्षकांच्या उदंड प्रेमाची फलश्रुती म्हणजेच नाटकाला मिळालेले अभूतपूर्व यश आहे. या नाटकाच्या लोकप्रियतेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची ‘रिपीट व्हॅल्यू’. एकदा नाटक पाहिल्यानंतर पुन्हा पाहावेसे वाटणे आणि प्रत्येक वेळी त्यातील विनोदावर मनापासून हसता येणे, ही सहजसाध्य गोष्ट नाही. ‘सही रे सही’ने ती किमया साधली आहे. नाटकातील अनेक पात्रांचे संवाद रसिकांच्या तोंडपाठ आहेत.

२४ वर्षांचा हा प्रवास म्हणजे केवळ प्रयोगांची संख्या नव्हे. यातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, रंगकर्मी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लाखो प्रेक्षक यांच्या सामूहिक प्रेमाची कहाणी आहे. काळ बदलला, मनोरंजनाची साधने बदलली, ‘दूरदर्शन’पासून ‘ओटीटी’पर्यंत मनोरंजनाचे असंख्य पर्याय उपलब्ध झाले. मात्र, रंगमंचावर ‘सही रे सही’ची जादू कायम राहिली आहे. मोबाईल आणि डिजिटल मनोरंजनाच्या युगातही प्रेक्षक ४००-५०० रूपयांचे तिकीट काढून नाटक पाहण्यासाठी गर्दी करतात, हे या नाटकाच्या लोकप्रियतेचे खरे प्रमाण आहे.

रंगभूमीवरची लोकप्रियता क्षणभंगुर असते, असे मानणाऱ्यांना या नाटकाने २४ वर्षे सातत्याने चोख उत्तर दिले आहे. रौप्यमहोत्सवी वर्षात प्रवेश करण्याचा आनंद हा केवळ एका नाटकाचा उत्सव नाही. तर, मराठी रंगभूमीच्या ताकदीचा, कलाकारांच्या मेहनतीचा आणि प्रेक्षकांच्या अढळ प्रेमाचा उत्सव आहे. रौप्यमहोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर उभे राहून ‘सही रे सही’ आता पाच हजाराव्या प्रयोगाकडे झेपावत आहे. आजही रंगमंचावर पडदा उघडला की एकच आवाज घुमतो.
‘सही,
सही रे सही,
सही रे सही !…






















Join Our Whatsapp Group