पिंपळे सौदागर (Pclive7.com):- भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महापालिका प्रशासनाला दिलेल्या निर्देशानंतर पिंपळे सौदागर येथील ट्रायोज-झूलेलाल टॉवर या महत्त्वाच्या रस्त्याच्या विकासकामाला गती देण्यात आली असून, त्याअंतर्गत स्टॉर्म वॉटर (पावसाळी ड्रेनेज) लाईन टाकण्याच्या कामालाही वेग आला आहे. परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासह पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे.

या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शत्रुघ्न (बापू) काटे यांनी संबंधित प्रशासनाला कडक सूचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनांची तत्काळ अंमलबजावणी करत रस्त्यालगत आवश्यक पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने सुरू करण्यात आली आहेत.

ट्रायोज – झूलेलाल टॉवर हा परिसरातील प्रमुख संपर्क मार्ग असून, या रस्त्याच्या विकासामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या समस्येवरही मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येणार असल्याचे सांगण्यात आले. नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका कुंदाताई भिसे आणि नगरसेविका अनिताताई काटे हे स्वतः या प्रकल्पावर विशेष लक्ष ठेवून असून, कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेत आहेत. रस्ता विकासाचे काम दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालावधीत पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

परिसरातील नागरिकांना सुरक्षित, प्रशस्त आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात असून, काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group