वाकड (Pclive7.com):- नागरिकांना सार्वजनिक वाहतूक सेवेचा अधिक सुलभ आणि सोयीस्कर लाभ मिळावा या उद्देशाने आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या वतीने मोफत NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम वाकड येथील सौ. स्नेहा रणजित कलाटे जनसंपर्क कार्यालयात पार पडला.

“काम हीच ओळख, सेवा हीच शक्ती” या ब्रीदवाक्यानुसार राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत परिसरातील ६०० हून अधिक नागरिकांना मोफत NCMC स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले. नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे आणि रणजित आबा कलाटे यांच्या हस्ते नागरिकांना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घेतला. सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ, आधुनिक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मोफत NCMC स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले. नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे भविष्यातही अशाच लोकाभिमुख आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचे स्नेहा रणजित कलाटे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना त्यांनी, “नागरिकांची सुविधा आणि सेवा हाच आमचा संकल्प आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल,” असे सांगितले. उपक्रमाचा लाभ घेतलेल्या सर्व महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांचे रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.




















Join Our Whatsapp Group