पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदांच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी, दि.२२ जानेवारी २०२६ रोजी काढण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने अधिकृत पत्रक जारी केले आहे.

राज्यमंत्री (नगर विकास) यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत प्रक्रिया गुरुवारी दि.२२ रोजी सकाळी ११ वाजता मंत्रालय, मुंबई येथे पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांमधील महापौर पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे.

आगामी काळातील महापालिकांच्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीने ही आरक्षण सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, या प्रक्रियेवर राज्यातील सर्व महानगरपालिका तसेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून, १२८ पैकी ८४ नगरसेवक भाजपाचे निवडून आले आहेत. त्यामुळे महापौर पदासाठी कोणते आरक्षण पडणार आणि महापौरपदी कोण विराजमान होणार, याबाबत शहरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.






















Join Our Whatsapp Group