पिंपरी (Pclive7.com):- रस्त्यावर होणारा अपघात म्हणजे केवळ एक आकडा नसून, तो कुणाच्या तरी आयुष्याचा अंत, तर कुणाच्या तरी आयुष्यभराची वेदना असते. ही वेदना थांबावी, एकही जीव निष्कारण जाऊ नये, या संवेदनशील भावनेतून इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल व प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी प्रेरणादायी रोड सेफ्टी रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीस RTO विभागाचे प्रदीप शिंगारे (इन्स्पेक्टर ऑफ व्हेईकल) व शिवानी लाड (असिस्टंट इन्स्पेक्टर, मोटार व्हेईकल) हे मान्यवर अधिकारी उपस्थित होते. शाळेच्या वतीने संचालिका कमला बिष्ट, डॉ. संजय सिंह, शोभना सिंह, तसेच प्राचार्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन श्री. प्रशांत पाटील हे देखील उपस्थित होते. तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून या उपक्रमाला बळ दिले. रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत “हेल्मेट घाला – कुणाचं तरी घर सुरक्षित ठेवा”, “वेग कमी करा, आयुष्य वाढवा”, “वाहतूक नियम पाळा – तुमची वाट पाहणारी माणसं आहेत”असे हृदयाला भिडणारे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवले.

विद्यार्थ्यांच्या निरागस आवाजातील हा संदेश अनेक वाहनचालकांच्या मनाला थेट भिडला. रॅलीदरम्यान अनेक नागरिक थांबून हा उपक्रम पाहताना दिसून आले. काही वाहनचालकांनी त्या क्षणीच हेल्मेट घालणे, सीट बेल्ट लावणे यासारखे सुरक्षिततेचे नियम पाळण्यास सुरुवात केली. हीच या रॅलीची खरी यशस्वीता ठरली.
या प्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “रस्ता सुरक्षितता ही केवळ कायद्याची सक्ती नसून प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांमधून ही जाणीव निर्माण होणे ही समाजासाठी अत्यंत आशादायक बाब आहे.”
शिक्षणासोबतच संस्कार, सामाजिक भान आणि जबाबदारीची जाणीव रुजवणारा हा उपक्रम इननोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलच्या सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण ठरला. रॅली संपली… पण तिचा संदेश प्रत्येकाच्या मनात खोलवर कोरला गेला.. “नियम पाळा… कारण कुणीतरी तुमची वाट पाहत आहे.”
























Join Our Whatsapp Group