पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात आज स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. अवघ्या चाळीस सेकंदांच्या भाषणात त्यांनी भावनिक शब्दांत “दादा, मला माफ करा,” असे म्हणत आपली भावना व्यक्त केली आणि तेथून मंचावरून निघून गेले. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये क्षणभर शांतता पसरली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांदरम्यान अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. त्या काळात करण्यात आलेली टीका आणि एकेरी उल्लेख अजित पवारांच्या जिव्हारी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती.

आजच्या शोकसभेत मात्र राजकीय मतभेद बाजूला ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महेश लांडगे यांच्या भावनिक वक्तव्यामुळे या कार्यक्रमाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले असून, राजकारणापलीकडे जाऊन व्यक्त केलेली ही भावना असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.






















Join Our Whatsapp Group