पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे व दूरदृष्टीपूर्ण योगदान दिले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात वाघेरे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका एक सक्षम, आर्थिकदृष्ट्या सबळ व औद्योगिकदृष्ट्या प्रगत महानगर म्हणून उभी राहण्यामागे अजितदादा पवार यांचे नेतृत्व व मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. पाणीपुरवठा योजना, रस्ते व वाहतूक व्यवस्था, औद्योगिक विकास, नागरी पायाभूत सुविधा, जलनिस्सारण व्यवस्था तसेच महापालिकेची आर्थिक शिस्त व बळकटीकरण यामध्ये त्यांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय शहराच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे पिंपरी चिंचवड शहराला एक स्वतंत्र व सशक्त औद्योगिक आणि नागरी ओळख निर्माण झाली आहे.

त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, यामुळे त्यांच्या कार्याची आठवण कायमस्वरूपी जपली जाईल तसेच भावी पिढीला सार्वजनिक सेवेसाठी प्रेरणा मिळेल. नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणेबाबतचा प्रस्ताव मान्य करून संबधित विभागास त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी संदीप वाघेरे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group