पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्याकडून सूचना
पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी, तापकीर नगर प्रभागामध्ये मागील सहा महिन्यांपासून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने येणारे पाणी आणि काही भागात पूर्णपणे खंडित झालेला पुरवठा यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती. स्थानिक रहिवाशांकडून वारंवार तक्रारी येत असूनही प्रश्न सुटत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती.

या पार्श्वभूमीवर नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी पुढाकार घेत पाणीपुरवठा विभागाशी सातत्याने पाठपुरावा केला. अनेक वेळा मागणी करूनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेर त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश बरीदे, उपअभियंता हृषीकेश गेंगजे, कनिष्ठ अभियंता समीक्षा मालपुरे तसेच विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत रहाटणी प्रभागातील विविध भागांतील पाणी समस्येचा सविस्तर आढावा घेण्यात आला आणि तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या बैठकीनंतर प्रशासनाने हालचाली वेगवान करत आवश्यक दुरुस्ती, वाल्व तपासणी आणि पाईपलाईन व्यवस्थापनाची कामे हाती घेतली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून शिवराज नगर, तसेच इतर परिसरांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे. याशिवाय शास्त्रीनगर, नखाते वस्ती, बळीराज कॉलनी, सिंहगड कॉलनी, राजगड कॉलनी, सज्जनगड कॉलनी आणि गावठाण परिसरातही पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
“नागरिकांना पाणी मिळालेच पाहिजे” हा ठाम आग्रह नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी बैठकीदरम्यान धरला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर नागरिकांना दिलासा मिळाला असून रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याने रहाटणी, तापकीर नगर प्रभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.






















Join Our Whatsapp Group