पिंपरी (Pclive7.com):- आर.आर. आबांच्या पश्चात पाटील कुटुंबासाठी आधारवड ठरलेले ज्येष्ठ नेते अजितदादा यांच्या निधनाने कुटुंबावर पुन्हा एकदा मोठा आघात झाला आहे. अजितदादा यांच्या जाण्याने आमच्या आयुष्यात भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून हे दुःख पचवणे अत्यंत कठीण आहे, अशा शब्दांत आर. आर. आबांच्या कन्या स्मिता पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आर. आर. आबा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी अजितदादांनी स्वीकारली होती. आबांच्या पश्चात त्यांचे पुत्र रोहित पाटील आणि कन्या स्मिता पाटील यांच्या पालकत्वाची भूमिका अजितदादांनी निभावली. रोहित पाटील यांच्या राजकीय प्रवासात तसेच स्मिता पाटील यांच्या शैक्षणिक आणि वैवाहिक आयुष्याच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये अजितदादांची भूमिका मोलाची ठरली.

“आबा गेल्यानंतर निर्माण झालेली पोकळी अजितदादांनी भरून काढली होती. ते आमच्यासाठी वडिलांसारखेच होते. पण आता तेही सोडून गेले आहेत. यापुढे त्यांचे मार्गदर्शन, आपुलकी आणि आधार मिळणार नाही, ही जाणीव अजूनही मन स्वीकारत नाही,” असे सांगताना स्मिता पाटील यांचा कंठ दाटून आला.
आधी आर.आर.आबा आणि आता वडीलधारी अजितदादा यांच्या निधनामुळे पाटील कुटुंबावर दुहेरी दुःख कोसळले असून, या दुःखद प्रसंगी स्मिता पाटील यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत अश्रूंनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.






















Join Our Whatsapp Group