पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अनुभवी, कर्तृत्ववान आणि विकासाभिमुख नेता गमावला असल्याची भावना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली आहे. अजितदादा पवार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. कामाप्रती प्रचंड निष्ठा असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. राज्यातील विविध विकासकामांच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला असल्याचे बारणे यांनी सांगितले.

खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे की, अजितदादा पवार यांच्या संसदीय राजकारणाची सुरुवात पिंपरी-चिंचवड परिसरातून झाली होती. पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या बारामती मतदारसंघातून त्यांनी १९९१ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्या काळापासून त्यांचे पिंपरी-चिंचवड शहराशी अतूट नाते निर्माण झाले होते. एकत्र काँग्रेस पक्षात असताना अजितदादा पवार यांच्यासोबत जवळून काम करण्याची संधी मिळाल्याचे खासदार बारणे यांनी नमूद केले. नेता म्हणून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या सहवासातून राजकारणातील अनेक बारकावे शिकता आले, असेही त्यांनी सांगितले.

सर्वसामान्य कुटुंबातील अनेक कार्यकर्त्यांना घडवून मोठे करण्याचे काम अजितदादा पवार यांनी केले. स्पष्ट वक्ता, निर्भिड आणि रोखठोक भूमिका हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. “जे पोटात तेच ओठावर” ही त्यांची ओळख होती. पिंपरी-चिंचवड शहरावर अजितदादा पवार यांचे विशेष प्रेम होते. नियोजनबद्ध विकासाच्या माध्यमातून त्यांनी शहराला वेगळ्या उंचीवर नेले. शहराचा सर्वांगीण विकास करताना त्यांनी जागतिक पातळीवर शहराची ओळख निर्माण करण्यासाठी मोठे योगदान दिले.
अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे पिंपरी-चिंचवड शहर पोरके झाले असून राज्याचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे भावनिक शब्दांत खासदार श्रीरंग बारणे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.





















Join Our Whatsapp Group