चार प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कला मॉडेल्सचे ३१ जानेवारीला प्रदर्शन
पिंपरी (Pclive7.com):- मुंबई येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या देशातील प्रतिष्ठित काळा घोडा कला महोत्सवासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चार प्राथमिक शाळांची निवड झाली आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांची महोत्सवात सादर होणाऱ्या कला मॉडेल्ससाठी तयारी पूर्ण झाली आहे. हा कला महोत्सव ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक काळा घोडा परिसरात आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवामध्ये ३१ जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली कला मॉडेल्स प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशासनाधिकारी संगीता बांगर, कला नोडल अधिकारी श्रीकांत चौगुले, मुख्याध्यापक शिवाजी दौंडकर, सरस्वती भेगडे, वंदना इन्नानी, मृगनयना चव्हाण, कला शिक्षक अपर्णा मोरे, मुक्ता पाउसळकर, नेताजी घोलप, विकास आगवणे यांच्या अधिपत्याखाली विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
महापालिकेच्या शाळांमधील ११ ते १२ वयोगटातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कल्पकतेने आणि मेहनतीने ही मॉडेल्स तयार केली आहेत. या मॉडेल्ससाठी निवडलेले विषय हे केवळ कलात्मक नसून मानवी जीवन, विचारप्रक्रिया आणि आधुनिक शहरी संकल्पनांवर आधारित आहेत.
यामध्ये ‘अंतर्गत वळण’, ‘मानवी विचारांचे रोलरकोस्टर’, ‘रूपांतरण : जीवनाचे रोलरकोस्टर’ तसेच ‘स्कायवॉक : मर्यादांच्या पलीकडचे शहर’ या विषयांचा समावेश आहे. या संकल्पनांमधून विद्यार्थ्यांनी मानवी मनातील चढउतार, जीवनातील बदल आणि शहराच्या विकासाच्या कल्पना प्रभावीपणे मांडल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कला सादर करण्याची संधी
१९९९ पासून सुरू असलेला काळा घोडा कला महोत्सव हा देशातील एक महत्त्वाचा स्ट्रीट आर्ट फेस्टिव्हल म्हणून ओळखला जातो. कला, संस्कृती, संगीत, नृत्य, साहित्य आणि खाद्यसंस्कृतीचा संगम असलेला हा महोत्सव दरवर्षी हजारो कलारसिकांना आकर्षित करतो. अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला मंचावर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे.

निवड झालेल्या शाळा
साई जीवन प्राथमिक कन्या शाळा, जाधववाडी
श्री बापदेव महाराज प्राथमिक शाळा, किवळे
यशवंतराव चव्हाण प्राथमिक कन्या शाळा क्र. ६०/१, थेरगाव
श्री वैष्णो माता प्राथमिक विद्यामंदिर, इंद्रायणी नगर, पुणे
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची काळा घोडा कला महोत्सवासारख्या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील कला मंचासाठी निवड होणे अभिमानाची बाब आहे. शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता व कल्पनाशक्ती विकसित व्हाव्यात, या उद्देशाने शाळांमध्ये कला शिक्षणाला विशेष महत्त्व दिले जात आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ कलात्मक कौशल्येच नव्हे, तर विचार मांडण्याची क्षमता, आत्मविश्वास आणि संघभावना आत्मसात केली आहे. अशा संधी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरतात.
– विक्रांत बगाडे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी कला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेली मॉडेल्स ही त्यांच्या सर्जनशील विचारांची, कष्टाची आणि समजुतीची साक्ष देतात. मानवी जीवन, विचारप्रक्रिया आणि आधुनिक शहर संकल्पनांवर आधारित विषयांवर विद्यार्थ्यांनी केलेली मांडणी अत्यंत प्रभावी आहे. या प्रकारच्या कला उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संवेदनशीलता आणि आत्मविश्वास वाढतो.
– ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका






















Join Our Whatsapp Group