पिंपरी (Pclive7.com):- पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपात सध्या कमालीचा संघर्ष सुरू झालायं. महापौर पदावरून पक्षात जातिय रंग चढू लागलायं. चिंचवडमधून कुणबी असलेले शत्रुघ्न काटे विरूध्द भोसरीतील माळी समाजाचे राहुल जाधव असा सामना सुरू आहे. हे पद आपल्याकडेच राखण्यासाठी भाजपमधील दोन आमदारांच्या गटाने प्रतिष्ठापणाला लावलीलआहे. त्यामुळे आता हे पद चिंचवडकडे जाते की भोसरीतच राहाते याकडे साऱ्या शहराचे लक्ष लागले आहे.
पिंपरी चिंचवडचे ओबीसीसाठी राखीव असलेले महापौरपद आपल्याकडे ठेवण्यासाठी काल भोसरीच्या आमदार गटाने माळी कार्डाची खेळी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील २९ नगरसेवकांनी महापौर आपलाच करण्यासाठी थेट मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्षा निवासस्थानच आज गाठले. शत्रुघ्न काटे यांना महापौर करण्यासाठी ४३ नगरसेवकांच्या सह्यांचे पत्र यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. त्यानंतर सर्वांशी बोलून निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नितीन काळजे यांनी राजीनामा दिल्याने महापौरपद रिक्त झाले आहे. ते भोसरीतील होते. तसेच भोसरीच्या आमदारांचे समर्थकही आहेत.हे पद भोसरीत राहण्यासाठी काल भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या काही आजी माजी नगरसेवकांनी माळी समाज प्रतिनिधींबरोबर पत्रकार परिषद घेऊन महापौर माळी समाजाचाच करण्याची मागणी केली होती. त्यावर महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील लगेच आज थेट मुंबई गाठली. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते.
महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यात संघर्ष दिसून आला आहे. महापालिकेतील टेंडर प्रक्रिया तसेच सदस्य निवडताना या दोन कारभाऱ्यांमध्ये मतभेद दिसून आलेत. आता तर महापौर पदावरून थेट दोघांच्याही समर्थकांमध्येच उभी फूट पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापौरपदी नेमकी कोणाची वर्णी लागते, कोण कोणाला राजकीयदृष्ट्या चितपट करतोय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण या निवडीवरून भाजपात ‘नाराजीनाट्य’ होऊन बंडाचा झेंडा फडकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.