पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदावरून गेल्या आठवडाभर बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. माळी कार्ड, कुणबीसाठी मुख्यमंत्री भेट, खांदेश पुत्राला संधी द्या, अशा दबावतंत्रांमुळे या निवडीला चांगलीच रंगत आली असून उत्सुकता शिगेला पोहचली आहे. महापौरपदी कुणाची वर्णी लागणार याचा फैसला आज होणार आहे.
पिंपरीचे महापौर नितीन काळजे व उपमहापौर शैलजा मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा गेल्या मंगळवारी (दि.24) दिला. या रिक्त झालेल्या पदासाठी आज दि.३१ रोजी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपचा दुसरा महापौर आज निश्चित होणार आहे.
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राहुल जाधव यांच्या नावाला पाठींबा दर्शवला आहे. त्यासाठी शहरातील समस्थ माळी समाजाने पत्रकार परिषद घेऊन महापौरपदी माळी समाजालाच संधी द्या, अन्यथा परिणामाला सामोरे जा असा इशारा दिला होता. त्यापाठोपाठ चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक शत्रुघ्न काटे यांच्या नावाची शिफारस करण्यासाठी २९ नगरसेवकांच्या शिष्ठमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातले. हे घडत असताना मुळचे भाजपाचे असलेले नामदेव ढाके समर्थकांनी देखील महापौरपदी खांदेश पुत्राला संधी द्या अशी मागणी करत पत्रकार परिषद घेतली.
यासर्व नाट्यमय घडामोडींमुळे भाजपचा दुसरा महापौर कोण होणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आज मंगळवार दि. (३१) दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र) स्वीकारले जाणार आहेत. महापालिकेच्या नगरसचिव उल्हास जगताप यांच्या दालनात हे अर्ज दाखल केले जातील. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकाचाच अर्ज दाखल झाला, तर दोघांचीही निवड बिनविरोध निश्चित होईल. त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा शनिवारी (दि.४) विशेष सर्वसाधारण सभेत सकाळी अकरा वाजता होईल.या निवडणुकीसाठी पीएमपीएलच्या अध्यक्षा नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली हि विशेष सभा होणार आहे.





















Join Our Whatsapp Group