पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर करदात्यांसाठी “अभय योजना” राबविण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या योजनेअंतर्गत विलंबित करावरील दंड व व्याजामध्ये सवलत अथवा माफी देण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात वाघेरे यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत आतापर्यंत सुमारे 690 कोटी रुपयांहून अधिक कर वसुली करण्यात आली असून ही बाब निश्चितच कौतुकास्पद असल्याचे वाघेरे यांनी नमूद केले आहे. मात्र, कोरोना काळातील आर्थिक अडचणी, रोजगारावर झालेले परिणाम तसेच इतर कारणांमुळे अनेक नागरिक वेळेत कर भरणा करू शकले नाहीत. परिणामी, त्यांच्यावर विलंब शुल्क व दंडाचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने राबविलेल्या “अभय योजने”चा दाखला देत, त्या योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर थकीत कराची वसुली झाली असून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतही अशीच योजना राबविण्यात आल्यास करदात्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. प्रलंबित कराची वसुली जलद गतीने होईल. तसेच येत्या दोन महिन्यांत सुमारे 900 ते 1000 कोटी रुपयांपर्यंत कर संकलन होण्याची दाट शक्यता असल्याचे वाघेरे यांनी सांगितले. महापालिकेची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्यासह नागरिकहित लक्षात घेऊन अभय योजना तातडीने लागू करावी, तसेच आयुक्तांनी या प्रस्तावाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून संबधित विभागास अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावेत अशी आग्रही मागणी वाघेरे यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group