पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या डेअरी फार्म उड्डाणपूलाला ‘लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब उड्डाणपूल’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्र. २१ मधील सर्व नगरसदस्यांच्या वतीने डब्बू आसवानी यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री तसेच पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार साहेब यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टीपूर्ण व मोलाचे योगदान दिले असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. पाणीपुरवठा योजना, रस्ते व वाहतूक व्यवस्था, औद्योगिक विकास, नागरी पायाभूत सुविधा, जलनिस्सारण व्यवस्था तसेच महापालिकेची आर्थिक शिस्त व बळकटीकरण यांसाठी त्यांनी घेतलेले निर्णय शहराच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरले, असेही निवेदनात म्हटले आहे.
त्यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका एक सक्षम, आर्थिकदृष्ट्या सबळ व औद्योगिकदृष्ट्या प्रगत महानगरपालिका म्हणून उभी राहिली असून, शहराला स्वतंत्र व सशक्त औद्योगिक आणि नागरी ओळख मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी येथील नवीन डेअरी फार्म उड्डाणपूलाला त्यांच्या नावाने नामकरण केल्यास त्यांच्या कार्याची आठवण कायमस्वरूपी जपली जाईल, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.

सदर प्रस्तावाची दखल घेऊन तो मान्य करावा व संबंधित विभागास तातडीने कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी डब्बू आसवानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रभाग क्र. २१ मधील सर्व नगरसदस्यांच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.





















Join Our Whatsapp Group