पिंपळे सौदागर (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २८ मधील विविध विकासकामांचा सखोल आढावा घेण्यासाठी भाजपा नगरसेवक शत्रुघ्न काटे तसेच नगरसेविका अनिता काटे आणि नगरसेविका कुंदा भिसे यांच्या उपस्थितीत मॅरेथॉन आढावा बैठक व प्रत्यक्ष पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. निवडणुकीदरम्यान नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी तिन्ही लोकप्रतिनिधी ॲक्शन मोडमध्ये असून, विकासकामांना गती देण्यावर विशेष भर देण्यात आला.

आढावा बैठकीदरम्यान काही विकासकामांतील दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि दोन्ही नगरसेविकांनी संबंधित पालिका अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरले. कामांचा दर्जा, विलंबाची कारणे आणि अपूर्ण कामांबाबत सविस्तर स्पष्टीकरण मागत, ठराविक कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
यावेळी रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा, विद्युत, आरोग्य विभाग, स्ट्रीट लाईट्स तसेच उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामांमुळे नागरिकांना होत असलेल्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही सूचित करण्यात आले.

दरम्यान, सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांची गुणवत्ता व प्रगती तपासण्यात आली. विकासकामांमध्ये कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, तसेच नागरिकांना दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा ठाम संदेश या बैठकीतून देण्यात आला. या पाहणी दौऱ्यास नगरसेविका अनिता काटे, नगरसेविका कुंदा भिसे, जयनाथ काटे, संजय भिसे, संदिप काटे यांच्यासह संबंधित विभागांचे पालिका अधिकारी व कामांचे कंत्राटदार उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group