पिंपरी (Pclive7.com):- चिखली परिसरातील शिवरकर चौकात असलेला पीएमपीएमएलचे बस स्थानक सध्या मद्यपींचा अड्डा बनला आहे. त्यामुळे येथे नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत असल्याने हा बस स्थानक तात्काळ हटविण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यश दत्ता (काका) साने यांनी पीएमपीएमएल प्रशासनाकडे केली आहे.

या संदर्भात नगरसेवक यश साने यांनी वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल यांना (दि.०४) निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चिखली येथे शिवरकर चौक येथील बस स्थानकावर काही काळापासून कोणतीही बस सेवा सुरू नसल्यामुळे स्थानकाचा मूळ उद्देश संपुष्टात आला आहे. मात्र, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धूम्रपान व मद्यपान करणाऱ्यांचा वावर वाढला असून, त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी हा परिसर असुरक्षित बनत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सदर बस स्थानक तातडीने हटविण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक यश साने यांनी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि परिसरात शिस्त राखण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे यश साने यांनी स्पष्ट केले असून, पीएमपीएमएल प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.





















Join Our Whatsapp Group