पिंपरी (Pclive7.com):- निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सध्या मुंबई–पुणे महामार्गावरील निगडी बस स्टॉप परिसरात सुरू असून, या ठिकाणी पोकलँड मशीनच्या सहाय्याने रस्त्यावर खड्डे खोदण्याचे काम रात्रीच्या वेळेत सुरू आहे. या कामामुळे मोठ्या प्रमाणात आवाज होत असून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेत सुरू असलेल्या या कामामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच विद्यार्थी वर्ग त्रस्त झाला आहे. सध्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्या असून, या गोंगाटाचा त्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

या प्रकरणी नागरिकांच्या वतीने 112 क्रमांकावर तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस कंट्रोल रूम व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्याकडेही लेखी तक्रार देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी पुणे मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी या विषयाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.

निगडी बस स्टॉप परिसरात सुरू असलेले रस्ते खोदण्याचे मेट्रो प्रकल्पाचे काम रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत बंद ठेवावे, जेणेकरून नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागणार नाही, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास मेट्रो प्रकल्पाच्या कामाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.




















Join Our Whatsapp Group