पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट–१ पथकाने महिला चेन स्नॅचिंगच्या गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश करत दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १०० ग्रॅम सोन्याचे दागिने, अंदाजे ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून पसार होण्याचे प्रकार पिंपरी-चिंचवड, पुणे शहर तसेच नाशिक ग्रामीण भागात केल्याचे तपासात उघड झाले आहे. ५०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा माग काढण्यात आला.
पोलीस तपासादरम्यान आरोपी नाशिक परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तात्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी संत तुकाराम नगर व चिखली पोलीस स्टेशन हद्दीत चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. या आरोपींविरोधात नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीही २५ पेक्षा अधिक सोनसाखळी चोरी विरोधातील गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील संत तुकाराम नगर व चिखली पोलीस ठाण्यांत दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट–१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, पोलीस उप निरिक्षक प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, पोलीस हवालदार महादेव जावळे, जयवंत राऊत, देवा राऊत, शिवराम भोपे, अजय डगळे, शेळकंदे, पोलीस शिपाई संदेश देशमुख, लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव, तेजस भालचिम, चिखलकर खेडकर यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group