पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या किवळे, मामुर्डी, रावेत आणि विकासनगर प्रभाग क्रमांक १६ मधील विविध प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी शिवसेना नगरसेविका सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात प्रभाग क्रमांक १६ मधील रस्ते विकास, ड्रेनेज, डी.पी. रस्ते, नाले बांधकाम, स्मशानभूमी विकास, पाईपलाईन रस्ते तसेच सांस्कृतिक सभागृह उभारणीसह अनेक महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. मामुर्डी, किवळे आणि रावेत भागात वाढत्या नागरीकरणामुळे पायाभूत सुविधांची निकड असून नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मामुर्डी व किवळे परिसरात १२ मीटर ते १८ मीटर रुंदीचे रस्ते विकसित करणे, गहुंजे स्टेडियमकडे जाणारा सर्व्हिस रस्ता, विविध सोसायट्यांना जोडणारे रस्ते व फूटपाथ विकसित करणे, तसेच विकासनगर व रावेत भागातील टाऊन हॉल, शाळा इमारत व विद्युत वाहिन्यांचे कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच रावेत भागातील पाईपलाईन रस्ता, डी.पी. रस्ते, नॉन डी.पी. रस्ते तसेच नाल्यांच्या विकासकामांमुळे नागरिकांना दैनंदिन वाहतूक आणि पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येतून दिलासा मिळणार असल्याचेही पत्रात नमूद आहे.
संबंधित सर्व कामे त्वरित मार्गी लावावीत, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे केली असून, लवकरच या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group