पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या एकूण १३ मोटारसायकली जप्त केल्या असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

औद्योगिक परिसरात सातत्याने होत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महाळुंगे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस अंमलदार शुभम खंडागळे यांना आरोपी आंबेठाण चौक, चाकण परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत निलेश राजू मंडलीक आणि संदीप साहेबराव सोनवणे या दोन आरोपींना अटक केली.

तपासात आरोपींनी चाकण एमआयडीसी व आसपासच्या परिसरातून दुचाकी वाहने चोरून त्यांची विक्री केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून स्प्लेंडर, पल्सर, पॅशन प्रो आदी प्रकारच्या एकूण १३ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. हे गुन्हे उत्तर महाळुंगे, दक्षिण महाळुंगे, शिक्रापूर, करमाळा, चतु:श्रृंगी आणि चाकण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व त्यांच्या तपास पथकाने पोलीस उप आयुक्त श्वेता खेडकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली.






















Join Our Whatsapp Group