पिंपरी (Pclive7.com):- चिखली येथील कै. गजानन म्हेत्रे उद्यान व क्रीडांगणाची सध्याची अवस्था चिंताजनक असून, येथे असलेली खेळाची साधने व उद्यानातील सुविधा जीर्ण झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यश साने यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे उद्यान व क्रीडांगणाच्या तातडीने नुतनीकरणाची मागणी केली आहे.

या ठिकाणी पूर्वी करण्यात आलेली विकासकामे कालबाह्य झाली असून, नवीन व सुरक्षित सुविधा उभारणे अत्यावश्यक असल्याचे यश साने यांनी निवेदनात नमूद केले आहे. परिसरातील लहान मुले, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक नियमितपणे या उद्यानाचा वापर करत असल्याने सार्वजनिक सुरक्षितता आणि आरोग्याच्या दृष्टीने नुतनीकरण करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

उद्यानातील पायवाट, खेळणी, प्रकाशव्यवस्था तसेच क्रीडांगणातील सुविधा सुधारण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group