पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी मागील काही कालावधीपासून बंद आहे, त्यामुळे शहरातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. हा निधी तात्काळ सुरू करून त्यामध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड शहरच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने महापौर रवी लांडगे यांना (दि.१०) लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महापौर वैद्यकीय निधी बंद असल्याने अनेक गरजू रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत मिळत नाही आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब व गरजू रुग्णांच्या हिताचा विचार करून हा निधी तात्काळ सुरू करावा. तसेच सध्याच्या गरजेनुसार निधीची रक्कम वाढवावी, अशी ठाम मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

महापौरांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, जेणेकरून गरजू रुग्णांना वेळेत वैद्यकीय सहाय्य मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.






















Join Our Whatsapp Group